२८ एप्रिल २०२० “सारा” तर्फे अपर्णा ताई यांना श्रद्धांजली

२८ एप्रिल २०२० रोजी अपर्णाताई रामतीर्थकर यांचे सोलापूरला दुःखद निधन झाले, हे ऐकुन मन सुन्न झाले होते.

मला आठवते संस्थेच्या चवथ्या वर्धापन दिनासाठी ताईंना आमंत्रित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते योगेश पिंगळे व मी स्वतः सोलापूरला त्यांच्या राहत्या घरी गेलेलो. शांत ठिकाणी असलेला त्यांचा बंगला आम्हाला सापडायला जरा वेळच लागला पण जेव्हा आम्ही बंगल्या समोर गेलेलो तेव्हा लहानसे फाटका जवळ कसे उघडायचे ह्या विचारात कडी शोधत असतानाच समोरून खिडकीतून आवाज आला, “या … या आतून कडी उघडा …व आत या …” तो आवाज अपर्णा ताईंचा होता.

आता बंगल्याचा भाला मोठा दरवाजा उघडाच होता आत शिरल्या वर उजव्या भिंतीला मोठे मोठे तीन फोटो होते एक श्री तुळजा भवानीचा व दोन छत्रपती शिवरायांचे आणि त्या फोटोंखाली मोठ्या तलवारी व ढाली टांगलेल्या होत्या घरातूनच परत निघताना आम्ही विचारले तेव्हा त्यांनी सांगितलेले की ह्या तलवारी त्यांना भेट म्हणून मिळाल्या आहेत.

हॉल चे निरीक्षण करत करत आम्ही उजव्या बाजूने आत गेलो, तर अपर्णा ताई सिंगल पलंगावर बसलेल्या साधी कॉटन ची साडी घातलेली खांद्यावर शाल होती आणि हातात पुस्तक व लेखणी होती. आम्हाला बघताच चष्मा नाकावर घेतला आणि पुस्तकात लेखणी ठेवून पुस्तक बंद केले आणि आमचे स्वागत केले.

मी आजूबाजूला सहज नजर टाकली होती. बाजूला टेबल वर पुस्तके व तांब्या भांडे होते आणि त्यांच्या समोरच एक सिंगल पलंग होता. त्या वर आम्हा दोघास बसण्यास सांगितले. बसण्या पूर्वी मनानं तसेच कार्याने महान असलेल्या व्यक्तीला खाली वाकून मी पाया पडले व माझ्या पाठोपाठ योगेश पण पाया पडले.

लगेच अर्पण ताई म्हणाल्या, “मला तुम्ही खूप आवडल्या. संस्काराचे परिपूर्ण जाण असलेल्या तुम्ही आज मला भेटायला आल्या. मला आनंद झाला.”
हे ऐकुन मनात मला एक सेकंद असे वाटले, आपण खूप नशीबवान आहोत अश्या व्यक्ती आपल्याला भेटतात आणि आपले कौतुक करतात..
हे फक्त मी स्वतःशीच मनातच बोलले होते.

मी आणि संस्थेचे कार्यकर्ते योगेश यांनी आम्ही त्यांच्यासोबत खूप गप्पा केल्या आणि त्यांनी सुचवलेली 19 नोव्हेंबर 2018 ही तारीख सारा संस्थेच्या वर्धापन दिनासाठी पक्की केली. थोड्यावेळात आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

कार्यक्रमाला नोव्हेंबर मध्ये आल्या तेव्हा त्या नागपूर हून त्यांचा कार्यक्रम आटोपून दुपारी ठाण्यात कार ने पोहोचल्या होत्या. माझ्या घरीच थांबल्या.

त्यांच्या सोबत मी स्वतः दोन दिवस सतत होते. त्यांच्या कडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.

आमच्या भरपूर चर्चा व्हायच्या. विषय काय तर सामाजिक परिस्थिती, आजकालची बदलती लग्न संस्कृती, कुटुंबातील विभक्तपणा, सासू सुनेच्या नात्यातील झालेला बदल, तसेच क्षुल्लक कारणांवरून होणारे घटस्फोटाचे वाढते प्रमाण, इत्यादी इत्यादी…!

असे बरेचदा झाले की मला काही विचारायचे असल्यास, मी त्यांना फोन करून विचारून त्यांचे कडून अनुभवाचे धडे घेत असे.

त्यांच्या घरी एक कामाला बाई होत्या. अपर्णा ताईंनी आयुष्यभर त्यांचे घर सांभाळले. त्यां बाईंच्या मुलांचे शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. बाईंची मुले इंजिनियर झाली. पुढे त्यांची लग्न झाली.

एक दिवस अपर्णा ताई कामवाली बाईंना म्हणाल्या, “बाई आता तुमची मुले सुना मोठी झाली. तुम्ही आमच्याकडे धुणी भांड्यांची कामे करता. आता तुमचे मुले तुम्हाला काय म्हणतील ? तेव्हा आता तुम्ही काम सोडले तरी चालेल.” असे अपर्णा ताईंनी त्या बाईला म्हंटले तेव्हा त्या बाई म्हणाल्या, “मी तुमच्या सोबत राहेन आणि तुम्ही एवढ्या लोकांना सांभाळता तर मी पण तुमच्या कडे काम करून तुमच्या समाजकामात मदत करेन. मला संधी द्या.” असे त्या बाई ने अपर्णा ताईंना सांगितले होते.

अपर्णा ताईंकडे सारा ट्रस्ट कडून दरवर्षी जेव्हा मी उस्मानाबाद जायची, तेव्हा ठाणे हून सारा संस्थे कडून दोन बॅग्स भरून जुने कपडे घेऊन जायची. (अर्थात माझ्या सोबत मदतीला कायम आपल्या संस्थेचे करुध्यक्ष योगेश पिंगळे असत ) तान्ह्या मुलांपासून चे तर वयस्क व्यक्तींसाठी चे सर्व कपडे त्या स्वीकारीत असत. त्यांच्या बंगल्याच्या गच्चीत मोठ्या मोठ्या टिनाच्या पेट्या आहेत. त्यांची बाई इकडून तिकडून जमा केलेले जुने कपडे वयोमानानुसार वेगवेगळे करून स्वच्छ धुवून डांबराच्या गोळ्या घालून ठेवीत, जेणे करून कोणीही गरीब व्यक्ती कपडे मागायला आली की त्यांना लगेच कपडे काढून देत असे.

हा त्यांनी केवढा मोठा समाजा साठी उपक्रम हातात घेतलेला होता. ह्याची कल्पना मला मी बघितल्यावर आलेली.

अश्या बऱ्याच मोठ्या त्यांच्या कार्याची ओळख त्यांनी मला त्यांच्या घरी गेले असताना अगदी दोन तासात थोडक्यात सांगितलेली.
अपर्णा ताई त्यांच्या यजमानांची पत्रकारिता असो वा त्यांनी सहन केलेल्या संसारातील काही कडू गोड अनुभव असोत किंवा समाजकार्या चे विस्तारित काम असो. ह्या सर्वांचे अनुभव सांगत असताना त्यांच्या बोलण्यातून त्यांचे अफाट काम, त्यांची जिद्द ह्या मध्ये त्यांनी स्वतःला किती झोकून दिलेले हे दिसून येत होते.

अपर्णा ताई यांनी अविरत महिलांच्या न्यायासाठी तसेच घरा घरातील भारतीय संस्कृती जपून ठेवण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. त्यात त्यांना एक सात्विक आनंद मिळायचा हे मी त्यांच्या बोलण्यातून अनुभवलेले होते.

तो सहवास मी विसरूच शकत नाही. आज पुन्हा एकदा सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
अपर्णा ताई पाचव्या वर्धापन दिनाला आलेल्या. त्यांचे फोटो आणि वर्धापन दिनाला आपल्या सारा ट्रस्ट तर्फे ठाण्यातील विविध क्षेत्रात नाव जमवलेल्या व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार बहाल करण्यात आले.
ताईंना सारा ट्रस्ट तर्फे, परिवारातील सर्व सदस्यानं तर्फे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली।😞💐
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच श्री आई भवानी माते चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻😞