
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याची प्रथा असली, तरी सारा संस्थेने १० नोव्हेंबर ला कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह संपन्न केला.
तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले, तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुळशीला विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे.
कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.